Saturday, August 16, 2008

खयाली मिसळ: श्रीगणेशा!

नमस्कार,

मला नाही माहित हा ब्लॉग मी किती दिवस चालवेन. मला नाही माहित मी इथे काय लिहिन....मी तसा थोडाफार बेशिस्त, मूडी, वगैरे आहे, आणि हा ब्लॉग माझ्या याच मूडीपणाचं पिल्लू आहे. हुक्की आली लिहिण्याची, एखाद लेख एखाद दैनिकात छापून आला माझा, म्हटलं बघूया, कितपत ’शिस्तीत’ आणि ’नियमितपणे’ पोस्ट टाकता येतायत ते! ह्या दोन गुणांची सध्या मला नितांत गरज आहे....माझ्या करीयरची सुरूवात आता कुठे होऊ पाहतेय, मग हे गुण नकोत का असायला? हे गुण अंगी बाणवावेत, म्हणून केलेला हा संकल्प.....

आता माझ्याबद्दल. मला स्वतःबद्दल बोलायला...........आवडतं तसं, पण उगाच ब्लॉगला (क)’मी’पणा का आणा, म्हणून फारसं स्वतःबद्दल बोलणं मी टाळेन. एवढंच सांगतो, मी एक २२ वर्षीय मुंबईकर आहे. आर्थिक मुद्यांवर, आणि एकंदर बऱ्याच ’अर्थ’पूर्ण विषयांवर माझी ठाम मतं आहेत. ती मतं इथे मांडेनच मी; शिवाय आणखी इतर मुद्द्यांना हात घालावासा वाटलाच मला, तर तोही पर्याय मी स्वतःसाठी खुला ठेवला आहे, म्हणून ’खयाली मिसळ’. इथे आर्थिक विचारांची उसळ मिळेलच, पण जमेल/सुचेल/परवडेल तसे इतर प्रासंगिक, तात्विक, व इतर विचारांचे शेव-गाठी, कांदा, टॉमॅटो, शेंगदाणे वगैरेही सापडतील. खाताना आले मध्येच आणि आवडले, तर या आपल्या आचाऱ्याला एखादी दिलखुलास दाद अपेक्षित आहे.

आणखी एक डिस्क्लेमर: एक,मी मूडी आहे; आणि दोन, मला यापुढे वेळ फारसा वेळ मिळणार नसण्याची शक्यता दाट आहे. एखाद वेळेस महिनोन महिने पोस्ट टाकणार नाही, एखाद वेळेस रोज दोन-तीन टाकेन. जे व जेवढे इ-पदरात पडेल, ते व तेवढे गोड मानून घ्यावे लागेल...

तर अशा वकिली सावधपणाने आणि मनात आशा (hope या अर्थाने) घेऊन, या ब्लॉगचा श्रीगणेशा झाल्याचं मी घोषित करत आहे.

धन्यवाद, आणि येवा, ब्लॉग आपलाच आसा!

0 टिप्पणी(ण्या):