Tuesday, August 19, 2008

बेरोजगार अभिनेते!

परवाची एक बातमी फारच विलक्षण होती. म्हणे बालाजी टेलिफिल्म्स (ऊर्फ एकता कपूर) च्या उंबरठ्यावर एका स्ट्रगलिंग अभिनेत्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मला त्या माणसाची सहानुभूती वाटणं तर सोडाच, त्याची कीव आली. बेट्या, आत्मदहन केलंस हे तर घृणास्पद आहेच, आणि तेही कोणाच्या ऑफिससमोर! असो!

मला त्याची कीव येण्याचं अजून एक कारण आहे. तो आणि त्याच्यासारखे कितीतरी वॉन्नाबी अभिनेते मुंबईत येतात, आणि कोणी आयुष्यभर टॅक्सी चालवण्याचा अभिनय करत राहतं, तर कोणी रस्त्यावर काचा पुसण्याचा. कोणी भुकबळी गेल्याचाही अभिनय अक्षरशः जगतात. असे किती शाहरुख, अक्षय, प्रिटी, माधुरी आहेत, की ज्यांना काहीही बॅकग्राऊंड नसताना त्यांनी मुंबईत स्वतःचा झेंडा उंच केला? मी इथे सलमान, आमिर, अभिषेक, रानी, काजोल वगैरे फिल्मी खानदानाशी नातं सांगणाऱ्या अभिनेत्यांची नावं मुद्दाम घेतली नाहीएत. (ते गुणी नाहीत असं नाही, पण या विषयाशी प्रामाणिक राहण्यासाठी नॉन-फिल्मी लोकांची उदाहरणं घेतोय) ते सोडा, मुळात इथे किती vacancies आहेत? अगदी दर आठवड्यात सरासरी ३ मेनस्ट्रीम सिनेमा प्रदर्शित झाले असं समजू. ५२*३*२=३१२ लीड रोल दरवर्षी असतात (हिरो-हिरॉईन मिळून). एका अभिनेत्याने/अभिनेत्रीने सरासरी ६ सिनेमा करायचे ठरवले, तर जेमतेम ५२ अभिनेत्यांसाठी दरवर्षी वेकन्सी आहे. त्या ५२ पैकी जेमतेम १०-१२ खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. याउलट किती सप्लाय होत असतो कलाकारांचा? शेकड्यात? हजारात? बरं, त्यांच्यापैकी किती जणांना माध्यमाची जाण असते? त्यांना फक्त फेमस बनायचं असतं, बाय हुक, ऑर बाय क्रूक! त्यामागे काहीही व्हिजन नसतं. त्यांना स्वतःला माहित नसतं ते इंडस्ट्रीला कसले योगदान करणार आहेत ते. काहींना धड हिंदीही येत नसतं (अशांचे आदर्श कतरिना वगैरे असतात), आणि ’ती’ करू शकते मग आम्ही का नाही, असा आशावादी सूर त्यांनी लावला की माझ्यासारख्यांना उगाचच आपण आयुष्याला कंटाळून किरकिरतोय की काय, असं वाटू लागतं!

ज्यांना आकडेवारी हवीच आहे, त्यांच्यासाठी. टाईम्स मध्ये छापून आल्याप्रमाणे ’उत्तरे’तून (आपण ’मनसे’ विचार करत असाल, तर खास तुमच्यासाठी!) रोज १५० लोक बॉलिवूडची स्वप्नं घेऊन मुंबईत अवतरतात. दिनेश चतुर्वेदी (जनरल सेक्रेटरी, Federation of Western India Cine Employees) यांच्या म्हणण्यानुसार फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक बेरोजगारी ही अभिनय क्षेत्रात आहे! दर महिन्याला जवळजवळ २०० ’अभिनेते’ Cine and Television Artistes’ Association कडे नोंदणी करतात (म्हणजे वर्षाला २४००! आणि आपला उपरोल्लेखित वेकन्सीचा एस्टिमेट ३१२, अधिक रोजच्या साबणांमध्ये जे लीड रोल्स असतात ते)

बरं, हे प्रोफेशन आहे तरी कसं? जर तुम्ही बच्चन असाल, तर ३०-४० सलग अभिनय करू शकता, पण प्रत्येकजण बच्चन नसतो. तुमचं शेल्फ लाईफ फारफारतर १० वर्ष असतं, आणि अभिनेत्री असाल, तर त्याहीपेक्षा कमी. या कालावधीत त्यांना आयुष्यभराची कमाई करायची असते. आणि शिवाय दैनंदिन खर्च निभावून न्यायचे असतात. याचा अर्थ हे प्रोफेशन ’अर्थपूर्ण’ नाही. जर फेमस व्हायचे चान्सेस इतके कमी, आणि पैसे मिळवायचे त्याहूनही कमी असतात, तर लोक नेमका काय विचार करून अभिनेता/त्री व्हायचा निर्णय घेतात? की विचार करतच नाहीत?

सबब, अभिनयाचा व्यवसाय म्हणून विचार करणं, हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यासारखं आहे. त्याचा एक व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन म्हणून मात्र विचार होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो (मी हे फुटकळ आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांमध्ये काम केल्यानंतर म्हणतोय).

मग इंडस्ट्री मध्ये करियर होऊच शकत नाही का? माझ्या (पामराच्या) मते नक्कीच होऊ शकतं. पण त्यावर नंतर कधीतरी...

0 टिप्पणी(ण्या):