गुरुवार, २३ मे, २०१३

एक पुचाट चॅट की अचाट कहानी


आजकाल ट्विटरला चिडिचुप करून, फेसबुकच्या तोंडाला फेस आणून आणि गुगल-प्लसच्या तोंडालाही फेसच आणून व्हॉट्सऍपने लोकांची गर्दी आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलंय. व्हॉट्सऍपवर मोठ्ठ्या प्रमाणावर चॅटबहाद्दरांच्या सुंदर मैफली जमतात. अशीच एक मैफल माझ्या आकस्मिकपणे कानी (डोळी) पडली, आणि मी तिच्याकडे काणाडोळा करू शकलो नाही. तीच तुमच्याशी "शेयर" करतो....

पात्रपरिचय: तीन मैत्रिणी, अ, ब आणि क. प्रसंग: एका व्हॉट्सऍप ग्रूपवरच्या रात्रीच्या वेळच्या गप्पा

अ: ब, क, आहात???
ब: काय गं?
अ: बोरतंय... काय करतेयस?
ब: ब्रश करतेय...
क: हाईऽऽऽऽऽऽऽ!!!!! 
अ: वॉव! ब्रश!! B-) मग तो ब्रश तुझ्या कितव्या दातावरून फिरतोय?
ब: अगं आत्ताच डावीकडच्या पहिल्या दाढेपर्यंत पोचला. आता त्या दाढेच्या मागच्या बाजुला जाईल. :-)
क: हो गं बाई! दाढेच्या मागे नेच! नाहीतर दाढ किडेल. :-o
अ: हो ना! माझी अशीच किडली होती मागे.... :-(
क: त्या पुढच्या दोन दातांमध्ये फटीत खूप अन्न अडकतं हो! :-o तिथे पण ने!!
ब: हो गं! पहिल्यांदा ब्रश करतेय का मी? X-( गेली २५ वर्षं ब्रश करतेय. B-)
अ: बऽऽऽऽरं. :-।
क: ए बाय द वे, तू ती नवीन टूथपेस्ट चाखून पाहिलीस? सेन्सोडाईनची? का‌‌ऽऽऽऽय छाऽऽऽऽऽन टेस्ट आहे ना तिची? :-) :-*
अ: मला तर बाई पेप्सोडेंट आवडते. B-) अगं ते सोड, आता ओरल-बी ची टूथपेस्ट येतेय...
ब: ओरल.... :-o हं.... लक्षणं ठीक नाहीएत हो एका मुलीची!!! :-P
अ: ए जाऽऽऽऽ ना!!!! :-( :-(
क: लोल्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ. पण ब, तू कोणती पेस्ट वापरतेस?
ब: मी बबूल वापरते. B-) मस्त नॅचरल, हर्बल एकदम...
अ: B-)
क: ...पण बबूलने नुसतेच दात मजबूत होतात. आपल्याला फ्रेश ब्रेथपण पाहिजे ना...
ब: मग त्यानंतर माऊथवॉश करायचा. मी तर बाई फक्तऽऽऽऽऽऽ लिस्ट्रीन वापरते! एकदऽऽऽम मस्त वास येतो. :-)
क: किती तो मेला व्याऽऽऽप!!! एक ब्रश करते मी कसाबसा, त्यात माऊथवॉश करायला कुठून वेळ आणू? सकाळी ऑफिस असतं. :-(
ब: मग रोज ऑफिसला तशीच पारोशी "ब्रेथ" घेऊन जातेस? :-o 
क: पारोशी काऽऽऽऽय! X-( ब्रश केला नाऽऽऽ??? इथे काय हवालदारमामा मला रस्त्यात थांबवून माझ्या तोंडाचा वास घेत नसतो रोज न्यू इयर ईव्ह सारखा... X-(
ब: हाहाहाहाहा!!! लोल्झ्झ्झ्झ्झ्झ!!!
अ: हो पण नुसता ब्रश करून काय कामाचा? आधी ब्रश करायचा, मग फ्लॉस करायचा, आणि शेवटी माऊथवॉश... B-)
क: हो, म्हणूनच तुझी दाढ किडली होती ना? :-P
ब: ए क, बास गं! पिडू नकोस तिला.... :-D
अ: ए जाऽऽऽऽऽऽऽ नाऽऽऽऽ!!!! :-( मी जातेच आता...
क: :-o आता कोण कोणाला पिडतंय तूच सांग...
ब: ए माझा ब्रश झाला... B-)
क: आता तू फ्लॉस नाही का करणार?
अ: ए ब, तू कुठल्या ब्रॅंडचा फ्लॉस वापरतेस? मी बघ, इंपोर्टेड... B-) 
(अ फ्लॉसच्या डबीचा फोटो काढून इमेज शेयर करते.)
ब: वॉव! कुठून आणलास? B-) मी आपला नेहमीचा यशस्वी कोलगेट. :-।
अ: बाबा गेले होते लंडनला, तिथून माझ्यासाठी फ्लॉस घेऊन आले. B-)
क: :-।
अ: ए पण तू फ्लॉस कसा करतेस? म्हणजे तो दोन्ही हाताच्या अंगठ्यांत पकडतेस की इंडेक्स फिंगर्समध्ये? 
ब: अर्थातच अंगठ्यामध्ये. तसाच पकडतात. :-o
क: तिला कसा फ्लॉस पकडायचा माहीत नाही म्हणूनच दाढ किडली. :-D
अ: ए गप्पेऽऽऽ! X-( मी पण अंगठ्यातच पकडते. B-) मी एक-दोन महाभाग पाहिले होते इंडेक्स फिंगर्समध्ये पकडणारे... :-D
ब: आता माझा फ्लॉसपण झाला. B-) आता माऊथवॉश.. :-) :-) अ, तू लिस्ट्रीन वापरून बघ. एकदम स्ट्रॉंग फ्रेग्रंस आहे. B-)
अ: ब, मी कोलगेट फ्रेश टी वापरतेय सध्या... ती जाहिरात आहे ना, तो आयुषमान सारख्या भर लग्नात उठसूट गुळण्या करत असतो तो? तो पण मस्तय... B-)
क: हां, ती शहझान पदमसी पण आहे त्यात... 
अ: हां, तीच ऍड. :-)
ब: त्या आयुषमानचं लग्न असतं का त्या ऍडमध्ये? मग तो माऊथवॉशच्या गुळण्या घेत असतो, की मिठाच्या? :-P
क: हाहाहा!!!! बेस्ट!!! :-D तो लग्नानंतरची प्रॅक्टिस करत असतो...
अ: हाहाहा!!! ती टूथपेस्ट माहित्ये ना, टूथपेस्टमें नमक? तसं त्याच्या माऊथवॉशमध्ये नमक असेल... :-D
ब: ..... आणि अश्याप्रकारे माझा माऊथवॉशही झाला. आता मी झोपते! :-) 
अ: आंऽऽऽऽ थांब ना, माझा ब्रश व्हायचाय अजून...
क: अ, ब ला जाऊ दे, मी सांगते तुला ब्रश कसा करायचा ते... म्हणजे तुझी दाढ किडणार नाही. :-P
अ: ए क, तू भेट तुला बघतेच!!! X-(
क: हाहाहाहा!!! बघ, तुझा ब्रश ना, दाढेच्या मागच्या बाजूला ने, त्या पुढच्या दोन दातांमध्ये फटीत खूप अन्न अडकतं हो! :-o तिथे पण ने........
अ: X-( X-( X-(
...............................